दंत तंत्रज्ञानातील प्रगती - डिजिटल दंत चिकित्सा

    दंत चिकित्सेला जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून दिवसगानिक त्यात अनेक बदल घडून येत आहेत पूर्वीच्या काळातील दंतचिकित्सा शैली आणि आताच्या काळातील म्हणजेच आधुनिक दंत चिकित्सा “मॉडर्न डेन्सिस्ट्री “ (Modern  Denstistry) यात  प्रचंड फरक आहे. अत्याधुनिक डेंटल चेअर युनिट, कॉम्प्रेसर, हेडलाईट, इतर उपकरणे ई. मुळे विशेष फायदा असा झाला आहे की, दातांच्या उपचारासाठी लागणारा वेळ, होणाऱ्या फेऱ्या, पैसा व त्रास यासगळ्या गोष्टी आता कमी झाल्या आहेत. त्यामुळेच आज Modern Dentistry  हे एक प्रगतीशील  रूप  पाहायला मिळते.

    Painless Dentistry म्हणजेच वेदनारहित दंत उपचार हा आणखी एक फार महत्त्वाचा भाग ! आजकाल लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंतच्या कुणालाही त्रासदायक , वेदनादायक उपचार नको. उपचारासाठी येणारे रुग्ण प्रश्न करतात, “  मॅडम, आम्हाला त्रास तर होणार नाही ना ?”या प्रश्नाचे उत्तर मॉडर्न डेन्सिस्ट्रीने “नाही“ असे दिले आहे  !! छोट्याशा एक्स-रे मशिनपासून तर CBCT पर्यंतची प्रगती, Alginate च्या इम्प्रेशन पासून तर  3D प्रिंटिंगपर्यंत अशा एक ना अनेक डेंटल क्षेत्रातील नवनवीन उपचार प्रणाली व संशोधन खरंच थक्क करणारे आहेत. 

डिजिटल दंत चिकित्सा म्हणजे काय?
    डिजिटल  दंत चिकित्सेमध्ये दंतप्रक्रिया पार पाडण्यासाठी केवळ इलेक्ट्रिकल किंवा यांत्रिक साधने न वापरता डिजिटल किंवा संगणक - नियंत्रित घटकांचा सामावेश असतो.  ही अशी आधुनिक डिजिटल दंत चिकित्सा उपचाराची अचूकता आणखीच वाढवते. इमेजिंग ,मॅन्युफॅक्चरिंग आणि सॉफ्टवेअर इंटिग्रेशनमधील तांत्रिक प्रगती यांच्या मदतीने रुग्णांना सर्वोत्तम उपचार सहज व सोयीस्कररीत्या उपलब्ध होतात.हळूहळू पारंपारिक पद्धतीच्या जागी प्रगत वेगाने विकसित होत असलेल्या कमी इन्वेसिव तंत्राचा समावेश होत आहे.

डिजिटल उपचाराचे काय फायदे आहेत ?

  • अचूक परिणाम आणि सुलभ प्रक्रिया.
  • उत्तम रुग्णानुभव आणि आराम.
  • वेळ आणि खर्च वाचतो.

डिजिटल दंत चिकित्सेमध्ये वापरल्या जाणाऱ्या पुढील काही तंत्रज्ञानाचा समावेश होतो.

  • इंट्रा ओरल कॅमेरे.
  • डिजिटल एक्सरे.
  • सी.बी.सी.टी.
  • 3D   प्रिंटिंग
  • CAD/CAM
  • इंट्रा ओरल स्कॅनिंग.
  • दंत लेझर.

१)    इंट्रा-ओरल कॅमेरे :
        इंट्रा-ओरल कॅमेरे तुमच्या दातांची, आजूबाजूच्या हिरड्या तसेच इतर अवयवांची अचूक छायाचित्रे तयार करू शकतात.  यामुळे रुग्णाला,  तसेच दंत चिकित्सक आणि उपचारात गुंतलेले दंत तंत्रज्ञ यांना दातांमधील दोष  पाहता येतात.आतील संरचना चांगल्या प्रकारे समजून घेण्यास  हे कॅमेरे मदत करतात त्याप्रमाणे योग्य उपचार करणे सोयीस्कर होते. 

२)    डिजिटल एक्स-रे / सेन्सरद्वारे डिजिटल रेडिओग्राफ :
        दंत प्रतिमा या तंत्रज्ञानाद्वारे  केली जाते. डिजिटल एक्स-रे  हे पारंपारिक क्ष-किरणांपेक्षा जास्त आरामदायी असून  रेडिएशन एक्सपोजर कमी करतात (चार डिजिटल रेडिओग्राफ एका "फिल्म" क्ष-किरणांच्या समतुल्य आहेत). या व्यतिरिक्त, डिजिटल रेडियोग्राफ दंत चिकित्सकांना अधिक जलद व अचूक निदान करण्यासाठी मदत करतात,ज्यामुळे पुढील उपचार जास्त चांगले व परिणामकारक होऊ शकतात.

३)    कोन बीम सीटी:
        कॉम्प्युटेड टोमोग्राफी (CT Scan)चा हा प्रकार दंत चिकित्सकांना रुग्णाच्या जबड्याची तसेच मॅक्सिलोफेशियल संरचनेची त्वरित 3-डी प्रतिमा प्रदान करतो.
    दंत प्रत्यारोपण करताना ओरल सर्जन आणि पीरियडॉन्टिस्ट वापरत असलेल्या इम्प्लांट सर्जिकल गाईडचा हा मुख्य आधार आहे. अशा प्री-सर्जिकल इमेजिंग तंत्राने इम्प्लांट बसवणे अधिक सोपे आणि परीणामकारक होते.

४)    CAD/CAM :
    CAD/CAM (कॉम्प्युटर असिस्टेड डिझाईन, कॉम्प्युटर असिस्टेड मॅन्युफॅक्चर) हे तंत्रज्ञान संगणकीकृत मिलिंग तंत्राचा वापर करून दातांची पुनर्रचना करण्यास मदत करते. यामुळे  दंत चिकित्सक त्याच-दिवशी दाताचे पुनर्वसन पूर्ण करू शकतात.

    हे उपचार  पूर्ण करण्यासाठी पूर्वी दोन किंवा अधिक वेळा रुग्णालयात उपचारांची आवश्यकता लागत असे. याबरोबरच रुग्णाची  केस अधिक गुंतागुंतीची  असेल तर दंतचिकित्सक CAD/CAM तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक प्रभावीपणे उपचार करू शकतात.

५)     इंट्राओरल स्कॅनर :
    दातांच्या संरचनेची डिजिटल प्रतीकृती  तयार करण्यासाठी हे वापरले जाते. डिजिटल रंग कलर मॅप्स  हे अचूक रंग तसेच संरचने ची माहिती देतात व दातांच्या पुनर्वसनाचे कार्य सुलभ करतात.
    डिजीटल इंप्रेशनमुळे रूग्णांना पूर्वी प्रमाणे बेचव व अप्रिय पदार्थ दातांमध्ये वापरून इंप्रेशन बनवण्याची गरज पडत नाही,तसेच अशा पदार्थामुळे होणारी ओकारी ,मळमळ टाळता येते.

६)    डेंटल लेझर :
    दातांच्या कठिण आवरणाचा किंवा हिरड्यांच्या मऊ पेशींचा उपचार करतांना डेंटल लेसर ही प्रक्रिया सुलभ करतात. ही प्रक्रिया पूर्वी  गुंतागुंतीची व वेदनादायक होती.

    आता डेंटल लेझर मुळे आजूबाजूच्या भागात कमीतकमी ईजा व अत्यल्प रक्तस्राव होतो.सॉफ्ट टिश्यू लेझर हे हिरड्यांच्या अनेक प्रक्रियेसाठी एक परिपूर्ण साधन आहे. उदा.  रिकनटूरिंग आणि पीरियडॉन्टल थेरपी. विशेष म्हणजे हे उपचार  सामान्य दंतवैद्यांकडे देखील केल्या जाऊ शकतात.

    थोडक्यात , काय तर अलिकडे अत्याधुनिक दंत उपचार , डिजिटल दंत चिकित्सा उपलब्ध  आहे.  ही प्रक्रिया कमी वेदनादायी आणि कमी वेळात, अचूक दंत उपचार करण्यास मदत करते.

 

डॉ. साक्षी शाह
दंतरोगतज्ञ