संपादकीय

महाकविं कालिदासं वन्दे वाग्देवतागुरूम् ।
यज्ज्ञाने विश्वमाभाति दर्पणे प्रतिबिम्बवत् ।।

    आषाढस्य प्रथम दिवसे महाकवी कालिदास दिन तसेच निरामय या आपल्या लाडक्या त्रैमासिकाचा ७ वा वर्धापनदिन यानिमित्त सर्व संपादकीय मंडळ, लेखक, वाचकांचे हार्दिक अभिनंदन. “There are two ways of spreading light: to be the candle or the mirror that reflects it." (Edith Wharton) निरामयच्या माध्यमातून असाच आमच्यापरिने ज्ञानाचा प्रकाश पसरवण्याचा हा छोटासा यत्न. आरोग्यविषयक लेखांबरोबरच रुग्ण, सेवाव्रती, आरोग्य कर्मचारी तसेच डॉक्टरांचे मनोगत, पर्यावरण, योग व व्यायाम, सामाजिक, वैचारिक तसेच ललित, काव्य अशा कितीतरी वेगवेगळ्या विषयांनी संपन्न असे अंक निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. अशा सुंदर लेखांच्या संयोजनानेच हा सात वर्षांच्या टप्पा आज पूर्ण होत आहे आणि यापुढेही हा प्रवास असाच सुरू राहील अशी मनोकामना.

    आपल्या देशात वैद्यकीय क्षेत्रात रोज नवनवीन सुधारणा होत असूनही बऱ्याच दुर्गम भागांमध्ये आजही परिस्थिती बिकटच आहे, त्यात जर रुग्णाची अवस्था गंभीर असेल तर त्याला योग्य उपचारस्थळी पोहचण्यापासून ते योग्य उपचार मिळेपर्यंत तारेवरची कसरतच करावी लागते. अशाच मेळघाट सारख्या दुर्गम भागातून गंभीर अवस्थेत आलेल्या महिला रुग्णाचा अतिदक्षता विभागात भरती ते पुर्ण बरं होऊन डिस्चार्ज मिळेपर्यंतचा सगळा प्रवास उलगडला आहे डॉ श्यामसुंदर गिरी यांनी. यात रुग्णालयाने शक्य तेवढी आर्थिक मदत केली असली तरी विशेष कौतुक म्हणजे त्या रुग्णाच्या पतीचे ज्याने आर्थिक परिस्थिती कमकुवत असतानाही सर्वोपरी प्रयत्न केले व अत्यंत कृतज्ञतापूर्वक हॉस्पिटलचा निरोप घेतला.

    "बाळाच्या चिमण्या ओठातून हाक बोबडी येते" हे ऐकताना डोळ्यापुढे येतं ते छोटस छान गोड बाळ, परंतु लहान बाळ अपेक्षित वेळी बोललंच नाही तर? अशा लहान मुलांमधील "स्पीच डीले" म्हणजेच बोलण्यात होणारा उशीर, त्याची कारणे व त्यावर काय उपचार करता येतील याबद्दल माहिती बाल विकासतज्ञ डॉ.ऋषिकेश घाटोळ यांनी दिली आहे. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते असं आपण म्हणतो, मुलं वयात येणं ही अशी अवस्था आहे ज्यासाठी मुलंच काय पण पालकही पूर्णपणे तयार नसतात, तेच बदल जर वेळेआधीच सुरू झाले तर सर्वांचीच भंबेरी उडते, ही परिस्थिती समंजसपणे कशी हाताळावी याबाबत मार्गदर्शन केले आहे प्रा.वनिता राऊत यांनी.

    लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणून ओळखला जाणारा व आता आबालवृद्धांना परिचयाचा आजार म्हणजे मधुमेह, याचे योग्य निदान व मॉनिटर कसे करावे यावर माहिती दिली आहे रोगनिदान तज्ञ डॉ राजेश इंगोले सरांनी. वाढत्या वयाबरोबर येणाऱ्या शारीरिक समस्याबरोबरच मानसिक समस्याही दिसून येतात ज्यामधे स्मृतीभंश यासारख्या आजारांचा सामावेश होतो हातपाय धडधाकट असूनही मनुष्य परावलंबी बनून जातो, अशावेळी परिवाराबरोबरच शेजारी आजूबाजूचे लोक यांची मदत मिळाली तर अशा रुग्णांना आधार मिळतो व सुरक्षित वाटते, याच विषयावर माहिती दिली आहे वृद्ध उपचार तज्ञ डॉ दिपाली विधळे यांनी. दंत उपचार आता इतका सहज, सोपा, वेदनारहित झाला आहे. नवीन तंत्रज्ञानाचा अचूक वापर केला तर दातांचे आरोग्य राखणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे डॉ. साक्षी शाह यांनी. योगासनांमधील सर्वोत्तम असणाऱ्या सूर्यनमस्कारामुळे आपल्या संपूर्ण शरीराला व्यायाम होतो. याच्या रोजच्या सरावाने आपले शरीर मोकळे, निरोगी होते. प्रत्येकासाठी सूर्यनमस्कार खूप फायदेशीर आहे. योग दिनाच्या निमित्ताने याविषयी सविस्तर जाणून घेऊया योग प्रशिक्षक आनंद महाजन यांच्याकडून.

    शारीरिक स्वास्थ्य, मानसिक, अध्यात्मिक आणि भावनिक स्वास्थ राखण्यासाठी मन स्थिर कसे ठेवावे व मनःशांती कशी साधवी याचा बोध करून दिला आहे प्रा वैशाली देशमुख यांनी. माता केवळ पालनपोषण करत नाही तर ती बाळाची पहिली गुरू, मार्गदर्शक, टीकाकार, कठिण प्रसंगी बळ देणारी व यशस्वी झाल्यावर कौतुक करून प्रोत्साहन देणारी सर्वांगी असते, तिच्या ह्या कार्याचे मोल मोजण्याचे काही एकक असू शकेल काय? यावर मंथन केले आहे अतिशय संवेदनशील व जबाबदार माता असणाऱ्या डॉ मानसी कविमंडन यांनी.

    मानवी इतिहासात लागलेला सगळ्यात महत्त्वाचा शोध कुठला असेल तर तो चाकाचा, हे गोल गोल चाक मनुष्याच्या आयुष्यात गती नावाचं एक नवीन परिमाण घेवून आल, तेव्हापासून माणूस सारखा धावतोच आहे, लागणाऱ्या प्रत्येक शोधाचे स्वागत करत असताना आपण का धावतोय. तथाकथित प्रगती सगळ्याच क्षेत्रात होत असून त्यामुळे पर्यावरणाचे मात्र किती नुकसान होत आहे याकडे सर्वांचा कानाडोळा होत आहे असे वाटत नाही का? पर्यावरण विरुद्ध विकास हे जणू समीकरणच बनले आहे,यावर काय उपाय करावा व विकास होत असताना तो पर्यावरणाला पूरक व साधक कसा होईल यावर प्रकाश टाकला आहे डॉ प्राजक्ता पात्रिकर यांनी.

    सोशल मीडिया, मोबाईलचा अतिवापर,अमली पदार्थांचे सेवन,निरनिराळे प्रदूषण,कुपोषण या सगळ्या चक्रव्यूहात अडकलेले अभिमन्यू दिसत असूनही आपण स्वतःच अश्वत्थामा बनून अजून जन्माला ना आलेल्या पिढीचा देखील संहार करू की काय अशी भीती आता वाटत आहे, दुर्गतिकडे नेणाऱ्या या रथाचे चाक रुतून याला आळा बसणे आवश्यक आहेच परंतु येणाऱ्या पिढ्यांचा विनाश रोखण्यासाठी आता विधात्यावर सुदर्शन हाती घेण्याची वेळ आली आहे असे वाटते,तरच हा दिशाहीन समाज मार्गक्रमण करेल शाश्वताकडे, सुगताकडे.