पर्यावरण की विकास ?

आपल्या सभोवतालची जीवसृष्टी आणि तिला आवश्यक घटक म्हणजे हवा, पाणी,जमीन, वनस्पती, पशु,पक्षी, कीटक,माणूस. या सर्वांनी आपले परी + आवरण अर्थात पर्यावरण बनत असते.त्यातील प्रत्येक घटक महत्त्वाचा आणि एकमेकांना पूरक आहे.प्रत्येक कडी महत्त्वाची आहे. कोणतीही एक जरी कडी नाहीशी झाली तर त्याचे दुरगामी परिणाम होतात. या साखळीमधला फक्त माणूस ही कडी अशी आहे की जो आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाला स्वतःच्या सोयीनुसार वापरतो.पर्यावरण ही एक वैश्विक संकल्पना आहे.

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या स्टॉक होम परिषदेमध्ये ५ जून हा “विश्व पर्यावरण दिवस” म्हणून साजरा करावा,असे ठरविण्यात आले. अलिकडेच झालेल्या पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून पर्यावरण आणि विकास या दोन संकल्पनांच्या परस्पर संबंधांवर प्रकाश टाकण्यासाठी केलेला हा लेखन प्रपंच.

सध्याच्या पर्यावरणा संबंधी आपण आपल्यासमोर असणाऱ्या आव्हानांविषयी थोडेसे जाणून घेऊया.

वाढते तापमान : संशोधकांनी गेल्या दोन दशकातील भारतातील १४१ प्रमुख शहरातील तापमान वाढीचा अभ्यास केला. या अभ्यासामध्ये सॅटेलाईट आकडेवारीचा वापर करून तापमान वाढीवर शहरीकरण आणि हवामान बदल या निकषांवर हे सिद्ध झाले आहे की, जमिनीच्या पृष्ठभागांवरचे तापमान दिवसेंदिवस वाढते आहे. संशोधकांच्या मते ग्रामीण आणि शहरेतर भागात तापमान वाढीचे प्रमुख कारण स्थानिक हवामान बदल हे असून शहरी भागात काँक्रीट आणि जमिनीच्या वापरातील बदल हे तापमान वाढीचे प्रमुख कारण असल्याचे दिसते आहे.सध्याचे दिल्ली,मुंबई,भुवनेश्वर, जमशेदपूर हे तापमान वाढीच्या माऱ्याने प्रभावित झालेली शहरे आहेत.

ओला आणि कोरडा दुष्काळ: प्रदीर्घ काळापासून हळूहळू निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती सध्या अचानक निर्माण होते आहे.याबद्दल आपण काही विचार केला आहे का ?

अचानक दुष्काळाच्या घटना पूर्वीपेक्षा कितीतरी गंभीर होत आहेत.या संदर्भात केलेल्या संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, जमिनीचा पॅटर्न अर्थात पोत,यामध्ये मानवी निर्मित गोष्टींमुळे झालेला बिघाड.यामुळे हवामान तसेच (Bio Diversity )जैव विविधता यावर विपरीत परिणाम होतो आहे. परिणामी जगात दुष्काळी परिस्थिती वेगाने विकसित होत असून दरवर्षी सुमारे ०.१२ दिवस आधी दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याचे उघड झाले आहे.

 एकंदर जमिनीच्या पँटर्नमध्ये बदल होतो आहे. आर्द्र, गवताळ जमीन, शुष्क आणि कोरडी, तसेच बर्फाळ जमीन जलसंपृक्त होते आहे. तथापि, कुठे अतिवृष्टी, कुठे कोरडा दुष्काळ ! टेक्सास विद्यापीठातील संशोधना नुसार जमिनीतील आर्द्रता आणि वातावरण यांच्यातील एकमेकातील प्रक्रियेमुळे कोरड्या परिस्थितीत देखील ढगफुटी आणि अतिवृष्टी होत आहे .

जंगलातील वणवा: जगातील सर्वात मोठे जंगल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ॲमेझॉन रेन फॉरेस्टमध्ये लागलेला वणवा आणि त्यात जळून राख झालेली वर्षानुवर्ष जतन केलेली वनसंपत्ती सर्वांनाच ज्ञात आहे. जगाला २०% ऑक्सिजन पुरवणाऱ्या ॲमेझॉन पर्जन्य वनात २०२३ मध्ये लागलेल्या आगीत सुमारे ७०० चौरस किलोमीटरचे वनक्षेत्र नाहीसे झाले आहे. पृथ्वीचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनातील हा वणवा  ९९ % मानवनिर्मित कारणांनी लागला होता, हे कळल्यावर आपल्याला मोठाच धक्का बसेल.

पर्यावरण की विकास?

पर्यावरणावर झालेले सध्याचे परिणाम पाहता संशोधनांती असे लक्षात आले आहे, की वाढते तापमान, कोरडे दुष्काळ, अतिवृष्टी, ग्लोबल वॉर्मिंग. वाढती पूर परिस्थिती या सर्वांना हवामानातील बदल तसेच मानवाद्वारे केला गेलेला नैसर्गिक संसाधनांचा बेसुमार वापर आणि त्यावर न घातलेले प्रतिबंधात्मक आणि भरपाई स्वरूप प्रयत्न जबाबदार आहेत, असे म्हणावे लागेल.

मानव हा पर्यावरणाच्या साखळीतील अशी एक कडी आहे, जी कडी आपल्या गरजेनुसार व सोयीनुसार पर्यावरणातील इतर घटकांचा पाहिजे तसा वापर करून घेते. पर्यावरण रक्षण ही वैश्विक जबाबदारी आहे. ज्या जबाबदारीची धुरा आपोआप आपल्यातल्या प्रत्येकाने उचलायची आहे. यासाठी महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे Environmental wisdom. अर्थातच पर्यावरण विषयक अर्थपूर्ण शहाणपण! भारतामध्ये तसं पण एक प्रकारचे traditional environmental wisdom आहेच. ज्यामध्ये आपसूकच conservation म्हणजेच “जपणूक “ही आहे.

आता ही गोष्ट पाहण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे की, आपण करत असलेला विकास हा पर्यावरणाच्या आड तर येत नाही ना ? आणि जर असेल तर तो विकास थांबवावा की पर्यावरणाचा ऱ्हास होऊ द्यावा? वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी विकासाला पर्याय नाही. फक्त विकास हा पर्यावरणाचा शत्रू आहे, अशी मानसिकता न ठेवता विकास sustainable हवा.

रस्ते बांधणी असो किंवा सदनिका बांधण्याचा प्रकल्प, कॉलनीमधील नवीन सार्वजनिक बागबगीचा तयार करावयाचा असो किंवा एखादा मोठा शॉपिंग मॉल बांधायचा असो, कोणताही नवीन प्रकल्प सुरू करताना हा प्रकल्प इकॉलॉजीकली सस्टेनेबल ecologically sustainable आहे की नाही,याचा अभ्यासपूर्ण आढावा ecological survey द्वारे व्हायला हवा. विकासाचा कोणताही प्रकल्प उभारताना या ना त्या प्रकारे पर्यावरणाची हानी होणारच आहे. पण ती हानी कमीत कमी कशी करता येईल,हे पाहायला हवं.

विकासाचं मूळ समीकरण जे बनलंय की विकास म्हणजे infrastructural development + कॉंक्रिटीकरण आणि तेही खूप इंधन वापरून किंवा इंधनासाठी ! वर्षानुवर्षे विकासाची हीच व्याख्या आपल्या मनात ठसवली गेली आहे. ही व्याख्याच जर आपण बदलू शकलो तर पर्यावरण विरुद्ध विकास, हा प्रश्न बहुतांशी सुटेल. पण वर्षानुवर्ष बनलेली, ठसलेली ही विकासाची व्याख्या बदलायची तर पावले ही तशीच उचलावी लागतील. 

गोष्टीचे पर्याय शोधावे लागतील, मेहनत करावी लागेल,मानसिकता बदलावी लागेल. वर्षातून एकदा येणाऱ्या पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन अर्थात Rain water  Harvesting चा गंभीरतेने विचार करायला हवा . सिमेंटचे  रस्ते हा पाणी जमिनीत मुरण्याच्या प्रक्रियेमधला प्रमुख अडसर आहे. ठीकठिकाणी जमिनीमध्ये पाणी मुरण्याची व्यवस्था केली जावी. नेहमीच्या बिल्डिंगऐवजी ग्रीन बिल्डिंगचा विचार करता येईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक झाड तोडलं तर त्याऐवजी दहा झाडे लावून, त्याची साधारण दहा वर्षे जोपासना करावी. जास्तीत जास्त ऑक्सिजन देणाऱ्या पर्यायी अर्थातच कडुनिंब,वड, पिंपळ, चंदनासारख्या झाडांची लागवड करावी.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणताही विकास प्रकल्प हाती घेताना त्या प्रकल्पाचे carbon foot print  काय होतील आणि त्या कशा reserve करता येतील, याचा विचार तो प्रकल्प सुरू करण्याआधीच केला जावा. पर्यावरण हे जैव विविधतेने नटलेले आहे तर कोणताही नवा प्रकल्प सुरू करताना नैसर्गिक जमीन क्षेत्र आणि नैसर्गिक अधिवास यांची कमीत कमी हानी करण्याकडे कल असावा. एखादी नवीन बाग निर्माण करायची असेल तरी ecological landscaping च्या आधारे करावी. जेणेकरून स्थानिक जमिनीचा पोत, स्थानिक वृक्ष आणि आपसूकच त्यावर जगणारे प्राणी, पक्षी,कीटक आणि पर्यायने जैव साखळी देखील अबाधित ठेवता येईल. माती आणि पाणी यांचे ecological restoration  होईल. पर्यावरण आणि विकास या दोन परस्पर विरोधी संकल्पना नसून त्या दोन समांतर रेषांप्रमाणे हातात घालून चालणाऱ्या कशा करता येतील,याकडे आपला कल असावा.

पर्यावरण की विकास असे न म्हणता पर्यावरण आणि विकास हे म्हणण्याचे स्वातंत्र्य यावे. म्हणजेच पर्यावरणाविरुद्ध विकास असे चित्र न राहता पर्यावरण आणि विकास ही दोन एका रथाची चाके असल्याप्रमाणे काम करतील. आपल्याला पर्यावरण किंवा विकास यापैकी एकाची निवड करण्याची वेळ येणार नाही.

 

डॉ. प्राजक्ता सुमित पात्रीकर
 गणेश विहार ,अमरावती