मेळघाटचा कुबेर

    रात्री दोन वाजताच्या सुमारास डॉ. हेडगेवार हॉस्पिटलच्या इमर्जन्सी विभागात फोन खणखणला. १९ मे २०२४ च्या मध्यरात्री अवघ्या २७ वर्षाची, १ वर्षाची, आईच्या दुधावर अवलंबून असलेल्या निरागस बाळाची आई अत्यंत अत्यवस्थ अवस्थेत मेळघासारख्या दुर्गम भागातून कोट नावाच्या छोटयाशा गावातून हरिसाल, धारणी असा प्रवास करत अमरावतीत दाखल झाली.

    इमर्जन्सी विभागात तिची तपासणी केली असता पेशंटचे बीपी अत्यंत खालावलेले होते. पेशंटला तातडीने सलाईन सुरु करून आणि बीपी वाढवण्यासाठीचे औषधे सुरू करून डॉ. हेडगेवार हॉस्पिटल भाराणी मेमोरियल क्रिटिकल केअर विभागात दाखल करण्यात आले.
    पेशंटसोबत सोबतीला होते तिचा नवरा आणि १ वर्षाचे गोंडस, निरागस बाळ. अधिक विचारणा केली असता पेशंटला ५ ते ६ दिवसांपासून ताप येत होता. थंडी वाजत होती आणि दम लागत होता. गावामध्येच उपचार घेऊनही बरे वाटत नसल्यामुळे मेळघाटवरून जवळ असणाऱ्या मध्यप्रदेश सीमेजवळच्या बुऱ्हाणपूर येथील एका खाजगी दवाखान्यामध्ये भरती करण्यात आल्याचे समजले. खाजगी दवाखान्याच्या तपासणीमध्ये तिला रक्तामध्येच गंभीर असा जंतुसंसर्ग (sepsis)पसरल्याचे लक्षात आले आणि परिणामी किडनीवर सूज आली. सोबतच बीपी अत्यंत खालावलेले होते.बुऱ्हाणपुरमधील डॉक्टरांनी जंतुसंसर्ग होऊन किडनीवर परिणाम झाल्याचे नातेवाईकांना समजावून सांगितले आणि रुग्णाची तब्येत अत्यंत गंभीर असून क्रिटिकल केअरमध्ये भरती करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

    भौगोलिक, सामाजिक आणि पिढीजात कारणामुळे आलेले अज्ञान आणि  माथी जन्माला घेऊन आलेल्या आर्थिक दारिद्र्याच्या दुष्टचक्रामध्ये सापडलेल्या या कुटुंबाच्या पायाखालची जमीनच, डॉक्टरांनी तब्येतीबद्दल सांगितलेल्या माहितीने सरकली. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अमरावतीमधील पीडीएमसी हॉस्पिटलला नेण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला.

    १८० कि.मी.पेक्षा जास्त अंतर कापून अमरावतीमध्ये एवढा गंभीर अवस्थेत असलेला पेशंट कोणतीच दुर्दैवी वेळ न येता पोचणार की नाही,याबद्दलच मुळात शंका होती. या प्रकारच्या गंभीर रुग्णांना शिफ्ट करण्यासाठी सर्व सुविधायुक्त अँबुलन्स ( Cardiak Ambulance) आणि डॉक्टरांची टीम सोबत असणे आवश्यक असते. सुविधांचा अभाव, अज्ञान, आर्थिक दारिद्र्य,मनुष्याला लाचार बनवते. अशा परिस्थिती समोर बरेचसे लोक हार पत्करतात.

    पुराणामध्ये सावित्रीने तिच्या सत्यवानाचे प्राण परत आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावले होते परंतु इथे मात्र एक सत्यवान त्याच्या सावित्रीसाठी, त्याचे सर्वस्व पणाला लावायला तयार झाला. या बापाची एक वर्षाची गोंडस छोटी मुलगी होती. तिनं आयुष्यभर आईच्या मायेच्या छत्राला आणि आईच्या दुधाला पारखं होवू न देण्याचा चंग बांधलेला बाप त्या माऊलीला धीर देत होता.मृत्यूच्या या टांगत्या तलवारीला तोंड देण्यास ती माऊली सज्ज होती आणि तिला शेवटच्या श्वासापर्यंत साथ देण्याचे तिच्या नवऱ्याने ठरवले.मग मिळेल त्या वाहनाने ५ तासांपेक्षा जास्त प्रवास करीत ते अमरावतीमध्ये आले. दुर्दैव असे की पीडीएमसीच्या आयसीयुमधील बेड फुल झाल्यामुळे जागा नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मग या गोंधळलेल्या, घाबरलेल्या मन:स्थितीमध्ये या कुटुंबाला आठवण झाली ती मेळघाटात जन्मलेल्या आणि डॉ. हेडगेवार हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये टेक्निशियन म्हणून काम करणाऱ्या हितेंद्र पवार यांची. त्याच्या सांगण्यानुसार डॉ. हेडगेवार हॉस्पिटल भाराणी मेमोरियल क्रिटिकल केअर युनिट येथे ते मध्यरात्री दाखल झाले.

    आयसीयुला पेशंट पोहचेपर्यंत पेशंटचे (systolik B.P.) वरचे बीपी ६० mm hg आणि हृदयाचे ठोके १४० पेक्षा जास्त,श्वासाचा दर ३२ ते ४० मिनिट रेकॉर्ड करण्यात आला. पेशंटला तातडीने IVC status नुसार अजून fluid देण्यात आले.बीपी वाढविण्याचे औषधे जास्त प्रमाणात लावण्यात आले. NIV मशिनने श्वासास सहाय्य देण्यास सुरुवात केली आणि अँटीबायोटीक्स सुरु करण्यात आले. जंतू संसर्गामुळे (Sepsis) रुग्णाचे बीपी कमी झाल्यामुळे कीडनीवर विपरित परिणाम झाला ( Serum Creatinine ४.२ mgdl ) असला तरी लघवीचे प्रमाण समाधानकारक आढळले.

     सकाळी पेशंटच्या उजव्या स्तनामध्ये पस (Abscess) असल्याचे हॉस्पिटलच्या फिजीशियन डॉ.कश्मिरा कडू यांच्या लक्षात आले. पेशंटच्या नातेवाईकांना सर्व गंभीर परिस्थितीबद्दल माहिती देऊन,ऑपरेशन करून हा पस बाहेर काढावा लागेल, असे सगळ्यांनी समजावून सांगितले. अडीच एकर शेतीवर आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करणाऱ्या या सत्यवानाने पहिला प्रश्न केला की, “खर्च किती येईल ?आमची आर्थिक परिस्थिती नाही.ICU मध्ये किती दिवस लागतील ? “या सगळ्या मानसिक अवस्थेत चिंता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. परंतु आपल्या आईला रात्रीपासून न बघितलेल्या एक वर्षाच्या मुलीची रडून झालेली अवस्था त्यापेक्षाही जास्त हृदय हेलावून टाकणारी होती. त्या आईची या गंभीर अवस्थेतसुद्धा,”माझ्या बाळाला भेटू द्या “ ही तिची विनवणी हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफलासुद्धा सुन्न करणारी होती. “खूप जास्त खर्च असेल आणि खूप जास्त दिवस आयसीयुमध्ये ठेवायची गरज असेल तर आम्ही हिला काही दिवस ठेवून घरीच गोळ्या औषधे देऊ शकतो का ? “असा प्रश्न रुग्णाच्या नातेवाईकांनी विचारला तेव्हा त्या प्रश्नांचे उत्तर माझ्याकडे नव्हते असे नाही, ते सांगण्याचे धैर्य नव्हते. हेडगेवार हॉस्पिटलच्या अशा गरजू रुग्णांसाठी असणाऱ्या आरोग्यवर्धिनी या योजनेच्या संदर्भात काय करता येईल, याबद्दल हॉस्पिटलच्या ट्रस्टीसोबत चर्चा करण्याचे ठरवले. सगळ्यांनी मनोमन त्याच्या पाठीशी उभे राहण्याचा सुखद निर्णय घेतला. आणि त्याला “ तू काळजी करू नकोस. बघू आपण “ असा शब्द देवून त्या क्षणी त्याचे दडपण कमी करण्याचा माझ्या वतीने प्रयत्न केला. सोबतच काही इतर सामाजिक ट्रस्टकडेसुद्धा मदतीचे प्रस्ताव पाठविण्याचे ठरले.

    त्या बाळाला तिच्या आईच्या मायेला दुरावू द्यायचं नाही, असा दृढ संकल्प हेडगेवार हॉस्पिटलच्या डॉक्टर चमूतील फिजिशियन डॉ. कश्मिरा कडू , सर्जन द्वयी डॉ. यशोधन बोधनकर व डॉ. श्याम भगत आणि आयसीयु तज्ञ डॉ. शामसुंदर गिरी,डॉक्टर चमू डॉ. अश्विनी मडावी,डॉ. जोहरा खान आणि आरएमओ डॉक्टरांनी घेतला. पेशंटला तातडीने ऑपरेशन करीता डॉ. श्याम भगत आणि भुलतज्ञ डॉ. कपिल अग्रवाल यांनी घेतले आणि यशस्वीरीत्या ब्रेस्ट ॲब्सेसचे incision आणि drainage  करून जंतू संसर्गाचा उगम शोधून काढण्यात आला आणि पेशंटला आयसीयुमध्ये परत शिफ्ट करण्यात आले.रुग्णाच्या किडनीवर आलेली सूज कमी होत होती. परंतु पेशंटच्या फुफ्फुसामध्येसुद्धा infection, जंतुसंसर्ग पसरला असल्यामुळे पेशंटला NIV मास्कद्वारे लावलेले व्हेंटिलेटरचे श्वासासाठी सहाय्य द्यावे लागत होतं. पेशंटचे हिमोग्लोबिन कमी झाल्याने रक्ताच्या दोन पिशव्या सुद्धा देण्यात आल्या.
    पुढील १ ते २ दिवसांमध्ये पेशंटच्या तब्येतीमध्ये झपाट्याने सुधारणा होत होती.बीपीसाठी लागणारे औषध कमी होत होते. Culture Sensetivity नुसार जंतू प्रतिकारक (अँटिबायोटिक्स )औषधे सुरू असल्यामुळे एकंदरीतच पेशंटला खूपच बरे वाटू लागले.

    रुग्णाच्या प्रकृतीत एवढी सुधारणा होत होती मात्र आपल्या पोटच्या गोळ्याला ५ ते ६ दिवस झाले भेटता आले नाही यामुळे आणि एकंदरीतच आयसीयुमधील गंभीर वातावरणामुळे त्या माऊलीच्या मनावर परिणाम होऊन ती असंबंध बोलू लागली. ( ICU psychosis)
    दुसऱ्या दिवशी सकाळी पेशंटला व्हील चेअरद्वारे पहिल्यांदा आयसीयु बाहेर आणले तेव्हा आपल्या बाळाला पाहून तिचे डोळे पाणावले.आपल्या आईला पाहून त्या निरागस बाळाच्या चेहऱ्यावरला आनंद बघून,” स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी “ असे का म्हणतात याची प्रचिती आली. हॉस्पिटलच्या सर्वच मातृशक्ती, कर्मचारी, परिचारिका, सुरक्षारक्षक, मावशी यांच्या चेहऱ्यावर त्यांच्यातील आईचे प्रतिबिंब स्पष्ट दिसत होते. सत्यवान मात्र एका कोपऱ्यात उभा राहून देवाचे मनोमन आभार मानत असल्याचे त्याच्या कृतज्ञ नजरेकडे पाहून जाणवत होते. सोबतच त्याची पैशाची जुळवाजुळव सुरु असल्याने ताणदेखील जाणवत होता. रुग्ण झपाट्याने बरा होत होत असल्याने परिश्रम सार्थकी लागले, ही समाधानाची भावना काम करीत असलेल्या संपूर्ण चमूला होती.

    पुढील दिवसांमध्ये पेशंटच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असूनही पेशंटला ताप मात्र येतच होता.यामुळे पेशंटला टाकलेली CVP line आणि लघवीची नळी काढून टाकण्याचा निर्णय घेतला. आणि पुढील दिवसांमध्ये तिला ताप येणे बंद झाले.

    पेशंटला सुटी देण्याचा दिवस जवळ येत होता. त्याची बिलाच्या रकमेची जुळवाजळव करण्याची धडपड पाहत होतो. या समाजामध्ये हॉस्पिटलचे बिल भरण्यावरून कितीतरी सुशिक्षित दिसणारे लोकसुद्धा हुज्जत घालतात, प्रसंगी गुंडगिरीसुद्धा करतात, बडया प्रस्थांचा दबाब आणतात, हे आम्हा डॉक्टरांना अनुभवास येतं. 

    तसं तर रुग्णाला हॉस्पीटलने आरोग्य वर्धिनी योजनेच्या अंतर्गत बरीच सवलत दिली होती, हे लक्षात घेऊन या सत्यवानाने अशिक्षित असूनसुद्धा औषधाच्या बिलाचे ८५ हजार रुपये भरले आणि आयसीयु बिलाचे अधिकाधिक पैसे काहीही तडजोड करून भरण्याची मनोमन तयारी दाखवली, तेव्हा उच्च शिक्षित आणि जास्त श्रीमंत खरेच कोण? असा प्रश्न मनात आला. आम्ही आमच्या परीने जवळची पदरमोड करून जास्तीत जास्त बिल भरतो.उरलेलीच काय ती मदत आम्हाला हवी आहे, असे त्याने स्वाभिमानाने म्हटले तेव्हा तो मला कुबेरापेक्षाही अधिक श्रीमंत वाटला.

    आडमाप पैसा आणि गलेलठ्ठ पगार असणारे आणि या ना त्या मार्गाने बिल कमी करा, असा तगादा लावणारे किंवा वरून दडपण आणणारे श्रीमंत रुग्ण या सत्यावानापुढे मला भिकारी वाटू लागले. खुपदा हॉस्पिटलच्या योजनांचा दुरुपयोग करणाऱ्या धनाढ्य लोकांची कीव करावीशी वाटली.
    या माऊलीच्या हॉस्पिटलमधून सुटी होण्याच्या आदल्या दिवशीच एक फुफुसाचा आजार असलेला रुग्ण झटका येवून बेशुद्ध पडला आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. त्याला व्हेंटीलेटरवर घेण्यात आले आणि त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु झाले.

    या रुग्णाच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी अनेक राजकीय, तज्ञ डॉक्टर्स आणि प्रतिष्ठीत व्यक्तींचे फोन आले.त्यांच्या बोलण्यात सतत व्ही.आय.पी. असा उल्लेख व्हायला लागला. “डॉक्टर साहेब, तुम्ही जातीने लक्ष द्या” असे सल्ले देण्यात येत होते. परंतु देवाच्या भाषेत कुणीच व्ही.आय.पी. आणि सामान्य असे वर्गीकरण नसल्याने त्या रुग्णाला खूप प्रयत्न करूनही आम्ही वाचवू शकलो नाही. आम्हाला देखील दु:ख होतेच. प्रत्येक रुग्ण बरा होवून घरी हसत जावा, ही कोणत्याही डॉक्टरांची मनोमन इच्छा असते. आपण प्रत्येकाची या जगातून निरोप घेण्याची वेळ देवाने ठरवून दिलेली असते! माझ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका सर्जन शिक्षकाचे वाक्य मला आठवले, “डॉक्टर्ससाठी सगळे रुग्ण सारखेच. त्यात व्हीआयपी पेशंट किंवा सामान्य पेशंट असे काही असूच शकत नाही. असतो तो फक्त पेशंट !! “ पैसे देऊन व्हीआयपी रांगेत दर्शन घेणारे लोक मात्र देवाच्या न्यायालयात व्ही.आय.पी. रांगच नसल्याचे वास्तव विसरतात.

    सत्यवानाच्या या सावित्रीला आणि या कुटुंबाला घरी जाण्याची परवानगी देताना एका गोष्टीची विशेषत्वाने प्रचिती आली की, या मंदिरात कोणीच गरीब, श्रीमंत असा भेदभाव नसतो. या सत्यवानाने घरी जाताना आमची आवर्जून भेट घेतली. त्याला झालेला आनंद त्याच्या कृतज्ञ चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. धारणीकडे आले की, आमच्या गावी आणि घरी जरूर या, असे म्हणताना त्याचा उर भरून आला होता.त्याने हॉस्पिटलचा निरोप घेतला तरी आम्हा डॉक्टरांच्या मनात या मेळघाटच्या कुबेराने कायमचे घर केले, हे मात्र खरे !!

 

डॉ. श्यामसुंदर गिरी
क्रिटीकल केअर तज्ञ