मनःशांती 

आज मोबाईलवर गुड मॉर्निंग मेसेजेस पाहता पाहता चहाच्या कपासोबत एक सुविचार वाचला. ’शरीराची काळजी घेता तशीच मनाचीही काळजी घ्या’. मनात साने गुरुजींच्या ‘शामची आई’ मधल्या एका गोष्टीत श्यामच्या आईने शामला केलेला उपदेश मनात तरळून गेला ‘ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसा मनाला घाण लागू नये म्हणून जप हं.’साधासा विचार. कित्येक वेळा ऐकलेला, वाचलेला. पण अमलात आणण्यासाठी तितकाच कठीण.

मन:प्रसाद: सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः ।
भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते ।।
श्रीमद्भगवदगीता
अध्याय १७ श्लोक १६

मनाची प्रसन्नता, शांत भाव, ईश्वरचिंतन करण्याचा स्वभाव, मनाचा निग्रह, आणि मनातील भावांची पूर्ण पवित्रता हेच मनाचे तप म्हटले जाते.

वाचलं की कळतं, पटतं पण वळत नाही असा हा भाग आहे. आपण सतत शरीराची काळजी घेत असतो. रोजच्या जीवनात, जाहिरात विश्वात शरीराची काळजी, शरीराचे सौन्दर्य, शरीराचे आरोग्य याबाबत केवढा भडीमार दिसतो. वेगवेगळे खाद्यपदार्थ, सौन्दर्यप्रसाधने, दागदागिने, कपडे यांनी ओसंडून वाहणारे जाहिरातविश्व दिसते. आपणही सतत ऊन, वारा, पाऊस, थंडी, आजार, अपघात यापासून सतत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो. स्वतःला किंवा दुसऱ्यालाही थोडीशी इजा झाली की लगेच फुंकर घाल, मलम लाव, डॉक्टरकडे जा असे कार्यक्रम सुरु होतात. मग हीच पथ्ये आपण मनाच्या बाबतीत का नाही पाळत?

मनःशांतीचा विचार करता करता एका साध्वीचं याच विषयावरील चिंतन आठवलं. त्यांनी सांगितलं की मन शांत असणं ही मनाची नैसर्गिक आणि सहज अवस्था आहे, जशी निरोगीपणा ही शरीराची नैसर्गिक अवस्था. मग मनाची अस्वस्थता आपण इतकी सहज का स्वीकारतो? कोणी वाईट बोलला कि दुःख होते, मनाविरुद्ध काही झालं की राग येतो, इतरांचं काही चांगलं झालं की असूया वाटते. किती सहजपणे आपण काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, मोह या षड्रिपूंना बळी पडतो! आणि विशेष म्हणजे आपल्याला यात काहीही गैर वाटत नाही. आपल्या आजूबाजूचे आपले हितचिंतकदेखील या वागण्याला सहज स्वीकारतात. वाईट वाटलं, राग आला की त्यांच्या प्रतिक्रिया असतात.” बरोबरच आहे. इतकं नुकसान झालं, वाईट तर वाटणारच नं? काही काळ लोटल्यावर तो दुःखातून सावरेल. काळ हेच औषध आहे.आहे. “साधारणपणे हीच प्रवृत्ती आपल्याला दिसून येते. म्हणजेच हे षड्रिपू आपण नैसर्गिक म्हणून स्वीकारले आहेत. मनुष्य प्रवृत्तीचा हा एक अविभाज्य भाग आहे असेच साधारणपणे आपल्याला वाटत असते. परंतु या भावना नैसर्गिक नसून अनैसर्गिक आहेत. नैसर्गिक आहे ती मानसिक शांती. आणि या शांतीचा उगम दुसऱ्या व्यक्तीत किंवा भविष्यात नसून आपल्या मधेच आहे. तो कसा हे सांगतांना त्या साध्वीने फार चपखल उदाहरण दिलं. समजा एखाद्या आईला आपलं मूल उदास दिसलं तर ती आपल्या हातच काम सोडून त्याला विचारते.”काय झालं बाळा? का उदास आहेस? ती मुलाशी प्रेमाने बोलते, त्याला गोंजारते, हरप्रकारे त्याची समजूत काढते. शेवटी तिची मात्रा लागू पडते आणि मुलाच्या चेहऱ्यावर स्मित पसरतं. आपणही आपल्या मित्रांची, भावंडांची अशीच समजूत काढतो, त्यांना शांत करतो. मग आता सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की हा शांतीचा स्रोत, जो आपल्याच अंतरंगात आहे, ज्यायोगे आपण इतरांना समजावून सांगू शकतो, तो आपण स्वतःसाठी का वापरत नाही. मनाच्या नैसर्गिक अवस्थेला म्हणजेच शांततेला भंग करतील अशा विचारांना आपण का वारंवार थारा देतो?

मनाचा निग्रह, पवित्रता, षड्रिपूंवर विजय साधण्यासाठी नक्कीच फार मोठी साधना लागेल. परंतु, अर्धे आयुष्य झाल्यानंतर मनाची नैसर्गिक अवस्था शांती आहे आणि हा शांतीचा स्रोत आपल्याच अंतरंगात आहे, ही जाणीव देखील मानसिक शांतीच्या मार्गावरील पहिले पाऊल ठरेल. नाही का?

 


प्रा. वैशाली रवी देशमुख
अमरावती