प्रग्नानंदच्या आईच्या निमित्ताने....... 

भारताचा सर्वात कमी वयाचा ग्रँडमास्टर प्रग्नानंद टायब्रेक मध्ये गेलेला विश्वविजेते पदासाठीचा अंतिम सामना खेळतो आणि त्याच्या विजयासाठी त्याच्या आईसोबत संपूर्ण देश प्रार्थना करतो. नागलक्ष्मी या प्रग्नानंदच्या आईचे आपल्या मुलांकडे कौतुकाने पाहतानाचे फोटो सोशल मीडियावर सर्वत्र पाहायला मिळतात. पाठोपाठ प्रग्नानंदची बहीण वैशाली देखील आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बनून उज्वल यश संपादन करते. 

नागलक्ष्मी ताईंचे फोटो आणि पेपरमधून आलेलं त्यांचं छोटंसं शब्दचित्र यापलीकडे तर आपण त्यांना जाणत नाही. पण त्यांच्या चेहऱ्यावरचा साधेपणा, डोळ्यांमधली आशा आणि कौतुक, हे तर कोणाच्याही लक्षात येण्यासारखं आहे. त्या माऊलीने आपले जग आपल्या दोन मुलांभोवती गुंफले आहे, बुद्धिबळात त्यांनी असामान्य कामगिरी करावी यासाठी आपले जीवन वाहून घेतले आहे. घरातली शांतता, घरचे अन्न, क्लासच्या वेळा, दौरे-स्पर्धा सगळीकडे सोबत जाणे, भात आणि रस्सम करून खाऊ घालता यावा याची सगळी तयारी सोबत नेणे अशा लहान वाटत असल्या तरी खूप महत्वाच्या असणाऱ्या अनेक गोष्टी करण्याला त्यांनी प्राधान्य दिले. 

प्रग्नानंदने देशाचे नाव उंचावले तेच दिवस - चंद्रयान २ च्या सफलतेने सर्व देश उत्सहीत झाला, भारावून गेला आणि अभिमान आणि आत्मविश्वासाचे पर्व सुरु झाल्याचे जणू काही अधोरेखित झाले. या मोहिमेच्या यशामध्ये अनेक महिला शास्त्रज्ञांचा खूप मोठा वाटा होता. त्यांचेही फोटो सर्वत्र झळकले, त्यांच्या साड्या , गोल ठसठशीत कुंकू - त्यांचे भारतीयत्व उठून दिसले. सोबतच ' गोल रोटी कॅन वेट ' अशा स्वरूपाच्या फेमिनिस्ट पोस्ट्स सुद्धा त्यांच्या फोटोसोबत झळकल्या. 

कुटुंबातील आणि समाजातील स्त्रीच्या भूमिकेचा समग्र किंवा अनेकांगी विचार करायला उद्युक्त करणाऱ्या या समाजजीवनातल्या ठळक आणि सकारात्मक घटना होत्या. तिथून एक विचारमालिका सुरु झाली. 

नागलक्ष्मींची ओळख प्रग्नानंदची आई अशी आहे, स्वतंत्र ओळख असणाऱ्या स्त्रीपेक्षा ती कमी आहे का? बरं ती फक्त प्रग्नानंदची नाही, वैशालीची सुद्धा आई आहे. पडद्यामागून आपली भूमिका वठवणाऱ्या स्त्रीने स्वतंत्र ओळख असणाऱ्या एका स्त्रीची ओळख निर्माण करण्यात देखील कोणतीच कसर ठेवलेली नाही. शिवबाची आई म्हणून जिजाबाईंचा जो मान आहे, शिवरायांना घडवण्यात आणि पर्यायाने हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात जो वाटा जिजाऊंचा आहे, तसाच वाटा देशाला दोन अनमोल रत्न देण्यात या आईने उचलला आहे हे खरे नाही का? चंद्रयान मोहिमेच्या यशात सहभागी असलेल्या प्रत्येक महिला आणि पुरुष शास्त्रज्ञाच्या पाठीमागे अशीच एक आई असेल. आणि त्यातील प्रत्येक महिला शास्त्रज्ञ सुद्धा कोणाची तरी आई असेल. कोणाला कोणत्या मापात तोलायचं ? नागलक्ष्मींना,  डॉ. रितू करिधाल किंवा डॉ. वनितांच्या पारड्यात की त्याच्या उलट? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासक म्हणून किती महान होत्या हे आपण जाणतो. त्यांच्या कर्तृत्वातून आजही कित्येक क्षेत्रातील अग्रणींना सुद्धा अनेक गोष्टी शिकता येतील इतका त्यांचा दृष्टिकोन व कार्य व्यापक होते. पण दुर्दैवाने त्यांच्या संततीच्या हातून त्या तोडीचे कार्य घडले नाही, म्हणून त्यांच्या आईपणाला दोष देता येतो का? त्यांच्या कर्तृत्वाला गालबोट लागते का? 

आईपणाची कसोटी मोठी कठीण आहे. त्या कसोटीची सुरुवात तर प्रत्यक्ष बाळाचा जन्म होण्याच्याही आधी होते. बाळाचे संगोपन, त्याचे पोषण, त्याच्या सवयी, त्याचे संस्कार, हा व्यक्तिनिर्माणाचा पाया  ती भरत येते, पण ते काम मूल कितीतरी मोठे होईपर्यंत सतत करावे लागते. आईच्या हातचा स्वयंपाक आणि आईने पाठ करून घेतलेले स्तोत्र, आईने झोपवताना कुशीत घेऊन शंभर वेळा सांगितलेली एकच गोष्ट, आईचा मार, आईने केलेले कौतुक, सारे काही अनमोल. त्याबरोबर बाहेरच्या बदलत्या जगात आत्मविश्वासाने उभे राहण्याची ताकद आपल्या बाळात  यावी  म्हणून जाणीवपूर्वक कठोर व्हावे लागते. जे पिलू कुशीत निर्धास्तपणे  झोपते त्याचे पंख बलवान असावे हि तिचीच जबाबदारी. शिवाय तो झेप घ्यायला तयार होईल तेव्हा त्याची दिशा चुकू नये म्हणून डोळ्यात तेल घालून त्याला कळत-नकळत बऱ्या-वाईटाची ओळख करून द्यायला हवीच. मोहाच्या क्षणी तिच्या संस्कारांच्या पक्केपणाचा कस लागणार! मूल मोठे होते तशी आई मोठी होते! आपल्या आईपणाचे नवे-नवे कंगोरे तिला समजत जातात आणि ती रोज नव्या परीक्षेला सामोरी जाते. आणि हे सारे करत असताना त्या आईच्या आत कदाचित स्वतःचा शोध घेऊ पाहणारी एक धडपडी बाई सुद्धा असते!! तिला कसोटी कोणती लावायची? 

स्त्रीची स्वतंत्र ओळख, तिचे स्वतःचे कर्तृत्व, तिचे स्वातंत्र्य, तिचे अधिकार या साऱ्या गोष्टी खरं तर वरवरच्या आहेत. मोठे पारिभाषिक शब्द वापरल्याने एखादे गहन सत्य मांडल्याचा अविर्भाव आणता येतो, पण त्यामध्ये जीवनाची सरलता मात्र मात खाते. स्त्री स्वातंत्र्याची कितीही आदळआपट केली तरी प्रत्येक स्त्री सेलिब्रिटी होणार आहे का? पण तरीही  प्रत्येक स्त्री  तिच्या चौकटीत अनन्य आहे, महत्वाची आहे.कोणाची चौकट लहान, कोणाची मोठी, तर कोणाची अवाढव्य सुद्धा आहे. प्रग्नानंद चमकला म्हणून त्याची आई महत्वाची आहे, पण त्याच्या सारख्या प्रत्येक मुलाची आई तितकीच विशेष आहे! सगळेच मोठे होतील तर कौतुक कशाचे राहणार?! - मानवी नात्यांची उंची आणि खोली वेगळ्या मापाने मोजावी लागते. आपल्या चौकटीत आपण आयुष्य अर्थपूर्ण, सुंदर, विधायक , व्यष्टी-समष्टी-परमेष्टी या वरवरच्या पायऱ्यांना दृष्टीपथात आणणारे असे, कशा रीतीने  बनवतो या खरा अस्तित्वाचा सारांश आहे.

हाच विचार थोडा पुढे नेला तर आपल्या असे सहज लक्षात येते, की फरक वरवरचे असतात, पण केवळ स्त्रीचाच नव्हे तर सर्वांचाच प्रवास असा, आणि त्याचा सारांश हाच असतो. संपूर्ण सृष्टीला , त्यातील प्रत्येक घटकाला एकाच सत्याचा  आविष्कार  मानणाऱ्या सनातन, शाश्वत ज्ञानपरंपरेचे आम्ही वारस आहो!! आम्हाला हे समजायला कठीण आहे का? जड आणि चेतन यांचा देखील  चेतनेचे संपूर्ण स्पेक्ट्रम असा विचार जर प्राचीन ज्ञान परंपरेत केलेला असू शकतो तर त्या ज्ञानाच्या प्रकाशात आपण निदान स्त्री-पुरुषांना अभिव्यक्तीची परस्पर-पूरक रूपे म्हणून पाहू शकत नाही का? आत्मविस्मृतीच्या निद्रेतून बाहेर पडून,

    "सहजं कर्म कौंतेय , सदोषमपि  न त्यजेत्।
    सर्वारंभा हि दोषेण, धूमेनाग्निरिवावृताः॥”

    हा भगवंताचा उपदेश अंगिकारला तर आपल्या भूमिकेतल्या द्वंद्वाचे धुके दूर होऊन स्वतःची प्रतिमा प्रकाशमान होईल.

 

डॉ. मानसी कविमंडन
फिजिशियन