सूर्यनमस्कार : योग माझा

चलाचल सृष्टीचा सूर्य हा आत्मा आहे, असे वेदवचन आहे. ऋग्वेदानुसार, सूर्य हा गतिमान आणि स्थिर आहे. सूर्य हा जीवनाचा स्फूर्तिदायक स्रोत आहे. तो आपल्याला ऊर्जा आणि पोषण प्रदान करतो. म्हणून सूर्यपूजा आणि उपासना केली जाते. सूर्याशिवाय सजीव सृष्टी अस्तित्वात येऊ शकत नाही. म्हणून सूर्याला, त्या तेजाला नमन करणे म्हणजे सूर्य नमस्कार. त्याने आपल्याला नवा दिवस, तेज, प्रकाश दिला म्हणून सूर्यनमस्कार म्हणजे सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे होय. कारण पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा दाता हा सूर्यच आहे. 

आजच्या धावपळीच्या जीवनात शरीर आणि मन अस्वस्थ असते. शारीरिक, मानसिक आणि आध्यत्मिक आरोग्यासाठी अगदी एक पैसाही खर्च न करता तंदुरुस्त राहण्याचा एक मार्ग आपल्या प्राचीन संस्कृतीत पूर्वापार चालत आला आहे. तो आहे सूर्यनमस्कार. सूर्यामुळे सृष्टीला उत्साह, उष्णता, आनंद आणि जीवन मिळत असल्यामुळे प्राचीन काळापासून सूर्याला देवता मानतात. भारतात धर्म आणि आरोग्याची सांगड घालण्याची प्रथा प्राचीन काळापासून आहे. त्यामुळे सूर्यनमस्कार हा उपासनेचा मार्ग आहे.

सूर्यनमस्कार करताना मंत्र जप प्रार्थना आणि गायत्री मंत्राच्या अगोदर ओम् ॐ चे उच्चारण करावयाचे असते. मंत्रोच्चाराच्या नादाने शरीरात आणि मनात ध्वनी लहरी उठतात. ओंकार तर अक्षरब्रह्म, नादब्रह्म, शब्दब्रह्म आणि एकाक्षर ब्रह्मच आहे. सूर्य नमस्कारात आसन, बंध, मुद्रा, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी आणि मंत्रोच्चारणाने शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक आणि आध्यात्मिक चैतन्याचे उन्नयन होते. अष्टांग योगाचा लाभ होतो. धारणा, ध्यान, समाधीला पातंजली महामुनी “विभूतीयोग” म्हणतात. भूत म्हणजे जो जन्मला आहे आणि विभूती म्हणजे महामानव. अशा विभूती योगाद्वारे निर्माण होऊ शकतात.

सूर्यनमस्काराच्या १२ पायऱ्या किंवा आसन किंवा मुद्रा आहेत. १) प्रणामासन २) हस्तउत्तनासन ३) हस्तपादासन ४) अश्व संचलनासन ५) दंडासन ६) अष्टांग नमस्कार ७) भुजंगासन ८) अधोमुख स्वानासन ९) अश्व संचलासन १०) हस्तपादासन ११) हस्त उत्तनासन १२) ताडासन.

ॐ मित्राय नम:, ॐ रवये नम:, ॐ सूर्याय नम:, ॐ भानवे नम:, ॐ खगाय नम:, ॐ पूष्णे नम:, ॐ हिरण्यगर्भाय नम:, ॐ मरिचये नम:, ॐ आदित्याय नम:, ॐ सवित्रे नम:, ॐ अर्काय नम: ,ॐ भास्कराय नम:। असे म्हणून १२ सूर्य नमस्कार घालतात. तेरावा नमस्कार घालताना ‘ॐ श्रीसवितृ-सूर्यनारायणाय नम:’ असे म्हणतात. 

सूर्यनमस्कारातील बारा आसने एकमेकांशी पूरक आणि सहाय्यक आहेत. जसे आसन क्रमांक १-२, ३-४, ३-१०, ५-६, ७-८ ही आसने परस्पर विरोधी दिशांमध्ये स्नायूंना ताण देतात. एका सूर्यनमस्कारात बारा आसनांचा लाभ होतो. व्यायामाचा सिद्धांत आहे की, जेव्हा कोणताही स्नायू ताणून शिथिल करतो तेव्हा तो अत्यंत लवचिक आणि सशक्त होतो. सूर्यनमस्कारात पूर्ण शरीरातील स्नायूंना हा लाभ मिळतो.

मुलांनी सूर्य नमस्कार का करावेत? सूर्यनमस्कार हा परिपूर्ण व्यायामाचा प्रकार आहे. बारा वर्षाच्या मुलांनी सूर्यनमस्कार घालायला सुरुवात करावी. सूर्यनमस्काराने विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती आणि ग्रहण शक्ती वाढते, हे अनेक प्रयोगात सिद्ध झाले आहे. सूर्यनमस्कार केल्यास आरोग्यावर चांगला परिणाम होवून मुलांच्या मेंदूचा विकास होतो, एकाग्रता वाढते व शरीराच्या सर्व अवयवांचा चांगला व्यायाम होतो. मुलांवर आजकाल मोठ्या प्रमाणात तणाव असतो. यातून मुलं चिडचिडे होतात. मुलांमध्ये एकाकीपणा निर्माण होतो. सूर्यनमस्काराने मनावरील ताण कमी होतो. अभ्यासात उत्साह वाटतो. रक्तप्रवाह चांगला राहतो. त्वचेचे व केसांचे आरोग्य सुधारत असते. शरीर पिळदार होते व उंची वाढते सूर्योपासनेमुळे चेहऱ्यावर तेज येते.

आपल्या पोटात मराठीत जठर, यकृत म्हणजे लिव्हर, प्लिहा, स्वादुपिंड, लहान आंतडे, मोठे आतडे, मुत्रपिंड वगैर अवयव आहेत. ह्यातील लहान आतड्याची लांबी २२ फूट आहे. निसर्गाने एवढ्याशा जागेत एवढे अवयव व २२ फूटाचे आतडे कसे बसविले असेल? २२ फूटाची कमीत कमी व्यासाची एवढ्या लहान जागेत कशी राहते आणि आपण जे अन्न खातो त्याचे आकारमान किती? हे कसे? विचार चालेना! एक दिवस एक फुगेवाला नळीचा फुगा पंपाने हवा भरताना पाहिला आणि कोडे सुटले. आपण अन्नाचा घास घेतो तेव्हा आतड्याचा व्यास वाढतो, म्हणजे अन्न पुढे पुढे सरकणे व न पचलेले अन्न शरीराबाहेर, पडणे ह्यासाठी आतड्याचे आकुंचन व प्रसरण होणे आवशक आहे. म्हणजे पोट एकदा दाबले जाणे व ताणले जाणे आवशक आहे. नुसत्या चालण्याने ते होत नाही. पण सूर्यनमस्कारात ते होते.

सूर्यनमस्कारात आपण खाली वाकतो, तेव्हा पोट दाबले जाते. नंतर उजवा पाय दुमडतो व डावा पाय मागे नेतो, तेव्हा पोटाचा उजवा भाग दाबला जातो व डावा भाग ताणला जातो. नंतर ओणवे होतो तेव्हा पोट सरळ होते. नंतर ह्या स्थितीत धडाचा भाग वर करून आकाशाकडे पाहतो, तेव्हा पोट ताणले जाते. नंतर उठताना डावा पाय पुढे घेतो तेव्हा पोटाचा डावा भाग दाबला जातो व उजवा भाग ताणला जातो नंतर वाकलेल्या स्थितीत येतो तेव्हा पोट दाबले जाते. नंतर सरळ होतो तेव्हा पोट सरळ होते. ह्या क्रमाने पोट दाबले व ताणले जाते. पोटातील अवयव व्यवस्थित काम करू लागतात. अन्न नीट पचते, शौचास साफ होते, ह्याचा प्रोस्टेट ग्लँडला व स्रियांना गर्भाशय व ओव्हरीला फायदा होतो.

स्त्रियांनी सूर्यनमस्कार का घालावेत?
अनेक महिने डाएटिंग करून होत नाही, ते सूर्य नमस्कारांनी साध्य होते. सूर्यनमस्कारांत जास्तीचे उष्मांक वापरले जातातच परंतू पोटाच्या स्नायूंना ताण पडल्याने शरीर सहजगत्या सोप्या व स्वस्त पद्धतीने सुडौल बनते. सूर्यनमस्कारांतील काही आसनस्थिती ग्रंथीचे, जसे कंठग्रंथीचे (जी वजन नियंत्रित करते), कार्य सुधारतात व संप्रेरकांचा स्त्राव वाढल्यामुळे पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करतात. मासिक पाळीतील अनियमितता देखील सूर्यनमस्कारांनी नियमित होते. सूर्य नमस्कारांनी सुरकुत्या पडण्यास प्रतिबंध होऊन चिरतरुण व उत्साही राहण्यास मदत होते.

फायदे :
सूर्य नमस्काराने शरीर आणि मन सुदृढ होते, इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती वाढते. मणिपूर, अनाहत, आज्ञा आणि विशुद्ध चक्रावर सूर्यनमस्काराचा खूपच प्रभाव पडतो. सूर्य नमस्काराने आयुष्य, प्रज्ञा, बल, तेज, वीर्य लाभ होतो. दांपत्यसुख वाढते. ओज वाढते. जे भोजन आपण घेतो त्या अन्नापासून रस, रक्त चांगले तयार होते. शरीरातील शक्तीचक्रे सूर्यनमस्काराने जागृत होतात. पाठीचा कणा एकदम लवचिक होतो. लवचिक पाठीचा कणा हे युवावस्थेचे लक्षण आहे. (मनुष्य वयाने म्हातारा होत नाही तर पाठीचा कणा कडक झाल्याने म्हातारा होतो.) पाठीच्या कण्यात शरीराचे प्रमुख शक्तीचक्र असून ते जागृत ठेवण्यात आमच्या शक्तीचे रहस्य दडले आहे.

सूर्य नमस्काराने आमच्या शरीरातील ग्रंथी कार्यक्षम होतात. ज्याना कमी घाम येतो किंवा कधी घामच येत नाही त्यांच्या स्वेद ग्रंथी क्रियाशील होतात. इन्सुलिन निर्माण करण्याची क्षमता वाढते. निष्क्रिय झालेल्या कोशिका सक्रिय होतात. सूर्यनमस्काराचा सर्वात मोठा लाभ म्हणजे मेंदूला जास्त शक्ती मिळते, मेंदूत अनुकूल स्त्राव होतात. त्यामुळे उत्साह, साहस, स्फूर्ती मिळते. चेतासंस्था उत्तेजित होते. एकूण शक्तिपैकी २० प्रतिशत शक्ती मेंदूला हवी असते. आमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे ती कधीच मिळत नाही. प्राणायाम, आसने आणि सूर्यनमस्कारामुळे मेंदूला ३० टक्केपेक्षाही जास्त शक्ती सहजपणे मिळते. पोट पातळ होते, पचनक्रिया सुधारते. पोटातील गॅस, करपट ढेकर यावर नियंत्रण येते.

उगवत्या सूर्यकिरणांनी पोटातील जंतू नाहीसे होतात. “कमर का कमरा हो जाये, तो समझना कबर पास आयी है” पण सूर्य नमस्काराने शरीरातील जडता नष्ट होते. लठ्ठपणा कमी होतो. ज्याचे वजन कमी झाले आहे त्याचे पूर्ववत होते. सूर्यनमस्कार आमच्या शरीरातील कणाकणाला आवश्यक पोषक तत्वे पोहोचवतात. शरीराला विशेष शक्ती मिळते. थकवा जाणवत नाही, सोबतच मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त शुद्ध होतात. भ्रमणध्वनी रोज चार्ज करावा लागतो तसेच आमच्या शरीराला देखील नियमित व्यायामाने दररोज चार्ज करावे लागते. म्हणूनच सूर्यनमस्कार एक श्रेष्ठ व्यायाम आहे.आमच्या शरीरातील रक्त,रस, मांस, मज्जा, मेद अस्थी, वीर्य किंवा रज या सप्त धातूंचे आणि पंच ज्ञानेंद्रियांचे शुद्धीकरण सूर्यनमस्काराने होते. तो एक कर्म यज्ञ आहे. सौर ऊर्जेच्या यज्ञविधीत आम्ही या सप्तधातूंचे हवन करतो. म्हणजेच ते सर्व शुद्ध होतात. सूर्यदेवतेला यज्ञकुंड माना, त्याच्या तेजस आणि अग्नी तत्वाने आमची पाच ज्ञानेंद्रिये शुद्ध होतील. अशा शुद्ध इंद्रियात विषयांची आहुती दिली तर आमचा तमोगुण आणि रजोगुण कमी होऊन सत्वगुण वाढतो. स्वास्थ्य आणि शारीरिक शक्ती वेगळे पैलू आहेत. शरीर आणि स्नायुबल वाढवल्याने आम्ही खेळात आणि व्यायामात प्रगती करतो. तणावाला वेळीच घालविले नाही तर तो तुम्हाला संपवेल     भोग ही सामान्य माणसाची प्रकृती आहे. त्याला योग संस्कृतीची जोड दिली नाही तर विकृती निर्माण होणारच. अतः सावधान! विनोबाजी म्हणतात , मनुष्याच्या प्रकृतीत आलेली विकृती काढून मुळाकृती स्थापन करणे याचे नाव संस्कार. सूर्यनमस्कार हा अतिउत्तम दैनंदिन संस्कार आहे. व्यायामाच्या अभावामुळे शरीरात ताठरपणा आल्यास थोड्याथोडक्या कारणाने गंभीर दुखापत होते. नियमित व्यायामाने असले विघ्न टळते. सूर्यनमस्काराने रोग प्रतिबंधक शक्ती वाढते. तसेच औषधोपचाराची वेळ आलीच तर लवकर फायदा होतो.

सूर्यनमस्कारात जेव्हा आम्ही आकाशाकडे पाहतो, तेव्हा आमचा आशावाद आणि आत्मविश्वास पण आकाशाला भिडतात. हा भावनिक विस्तार आहे. IQ पेक्षा EQ कडे अधिक लक्ष दिले पाहिजे. व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात या प्रश्नाने उग्र आणि गंभीर रुप धारण केले आहे. प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबात आणि समाजात आनंदाचे वातावरण निर्माण करण्याकरिता सांघिक सूर्यनमस्कार, आसने, प्राणायाम या गोष्टी आत्मिक आनंद देणाऱ्या आहेत. अपरिचित सुपरिचित होतात. सुपरिचितांचा एक परिवार तयार होतो. समान मानसिक स्पंदन समाज सौष्ठव निर्माण करते. जीवनात सकारात्मक लाभ म्हणजे समतोल, सहयोग, समन्वय, सामंजस्य, सहकार आणि सहसंवेदना वाढतात.

सूर्यनमस्कारासाठी झोपण्या एवढीच जागा लागते.दररोज १२ ते १५ सूर्यनमस्कार घालायला १० ते १५ मिनीटे लागतात. सुर्योपासनाही होते. घरीच सूर्य नमस्कार घालीत असल्याने जीमची फी व जाण्या-येण्याचा वेळ आणि खर्चही वाचतो. हा योगाभ्यास शरीर, मन व श्वासाला एकत्र आणतो. सूर्य नमस्कार जलद केल्यास हृदयाचे आरोग्य सुधारते व वजन कमी होण्यास मदत होते. मन शांत व एकाग्र बनते. म्हणूनच वय , प्रकृती समस्या पाहता योग तज्ञाच्या सल्ल्यानुसार नियमित मार्गदर्शन आणि सराव केल्यास आबालवृद्धांना सूर्य नमस्कार फलदायी आहेत. सूर्यनमस्कार घाला , सर्वांगाने सुदृढ व्हा !

 

आनंद महाजन
योग प्रशिक्षक