तन्मना भोजनगत: चित्त:
वदनी कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे । सहज हवन होते नाम घेता फुकाचे ।
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रम्ह । उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ।।
खरेच, आपल्याकडे भोजन म्हणजे यज्ञकर्म मानले आहे. ज्याप्रमाणे यज्ञ करण्याकरिता आपण शांत चित्ताने, आनंदी वृत्तीने सगळे करतो त्याचप्रमाणे जेवण घेतानाही ते स्वस्थ मनाने, पूर्ण लक्ष एकाग्र करून ते केले पाहिजे. उभ्याने, टी.व्ही .पाहत, पुस्तके वाचत, चिडचिड करत जेवण करू नये. गंध, स्पर्श, चव इ. पंचेंद्रियांनी जेवणाचा आस्वाद घेतला तर पाचक रसचा चांगल्याप्रकारे स्राव होतो व त्याचा पाचन शक्तिवर चांगला परिणाम होतो तसेच एखाद्या पदार्थाच्या वासानेही भूक चाळवली जाते.
अलिकडे काय झाले आहे की, एकत्र बसून जेवणे, एकमेकांशी हसतखेळत संवाद साधत भोजन घेणे दुर्मिळ होत चालले आहे. प्रत्येकजण आपल्याला जमेल तसे जेवण उरकून घ्यायला बघतो आहे. पण ह्याचा आपल्या तब्येतीवर काय परिणाम होतो आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. जेवण बनवणाऱ्यानेही स्वच्छ हाताने, शुचिर्भूत होवून व शांतपणे, आनंदाने बनविले पाहिजे. स्वच्छ, ताजे आणि चवदार अन्नाला खाणाऱ्यानेही योग्य न्याय दिला पाहिजे.
एक घास ३२ वेळा चावला नाही तरी सावकाश जेवले पाहिजे. त्यामध्ये पूर्ण मन झोकून दिले पाहिजे तरच ते भोजन अंगी लागेल व प्रकृती चांगली राहील. नुसतेच बकाबका खाणे, जेवणामध्ये लक्ष नसणे, काही कारणाने आदळआपट करीत जेवणे ह्याचा प्रकृतीवर विपरित परिणाम होवू शकतो. अन्नाचे पचन नीट न झाल्यास आम्लपित्त, बद्धकोष्ठता इ. आतड्याचे विकार होऊ शकतात.
कमी जेवण किंवा जास्त जेवण दोन्हीही वाईटच! याकडे व्यवस्थित लक्ष नसेल तर आपण आपल्याच हाताने अनेक विकार ओढवून घेतो. म्हणून आपली प्रकृती चांगली रहावी असे वाटत असेल तर स्वस्थ मनाने, आनंदाने व सगळ्यांच्या सोबत एकत्र जेवणे हाच चांगला पर्याय आहे.